समुद्र म्हणजे माझ्यासाठी जीवन आणि त्याची अखेर सुद्धा. समुद्र म्हणजे मुंबईचा जुहू बीच आणि तिकडे खाल्लेली पाणीपुरी , ” गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ” असे म्हणून केलेले विसर्जन. समुद्र म्हणजे चिन्मय बरोबर घेतलेला पहिला रोमांटिक लॉंग वॉक. आमच्या हातांचा झालेला पहिला स्पर्श. समुद्र मला नेहमीच आपला वाटलाय. डोंगरा सारखा तो आपल्याला क्षुद्र वाटू देत नाही. ही आपुलकी मुळात माझ्या बालपणीची नऊ वर्षे मी मुंबईत काढल्यामुळे असावी.
तुम्ही पहिल्यांदा समुद्र बघितल्यावर तुम्हाला काय जाणवलं , आठवतयं का? भीति वाटली, आनंद वाटला , मज्जा वाटली , कुतूहल वाटलं , आठवतयं का ? माझी समुद्राची पहिली आठवण मुंबईच्या मरीन ड्राईवची आहे.
मी नऊ वर्षांची असेन, मी माझ्या पहिल्या बॅडमिंटन स्पर्धेत भाग घेतला होता आणि उपांत्य फेरी मधे माझा दारुण पराभव झाला होता.माझ्या मॅचचा अंपायर मॅच संपल्यावर उद्धटासारखा माझ्या बाबांना म्हणाला होता , ” अहो, तुमची मुलगी रॅकेट , क्रिकेट च्या बॅट सारखी धरते. तिला काही धड मुवमेंट नाही. नुसती पळत सुटते .बॅडमिंटन तिच्यासाठी नाही हो. ” मला आठवतयं, बाबांनी अंपायरवर खूप आरडाओरडा केला होता आणि मी भोकांड पसरले होते. मला रडताना बघून माझी लहान बहीण सुद्धा रडायला लागली. ( आजही काही बदल नाही. मी रडले की ती हमखास रडते आणि तिला बघून मी हसायला लागते ) या सगळ्या गोंधळात आई मात्र शांत होती. तिने आमचा झालेला पसारा आवरला आणि आम्हाला स्टेडियमच्या बाहेर आणले.आईने सुचवले, अंधेरीहून एवढ्या लांब मरीन ड्राईवला आलोच आहोत तर समुद्राकाठी जाऊन फेरफटका मारावा.
मरीन ड्राईवला पोचल्यावर मला जरा बरं वाटायला लागलं होतं. रडणं पण बंद झालं होतं. बाबांचा राग पण शांत झाला होता. आम्ही सगळे शांतपणे बसून समुद्राकडे पाहत होतो. माझ्या मनात बरेच विचार चालू असावे. हारण्याचं दुःख तर होतचं पण आई बाबांची आपल्यामुळे नाचक्की झाली असं मला वाटत होतं. त्यामुळे मला स्वतःवर राग येत होता. तेवढ्यात बाबांनी आईला विचारले ” आपण अदितीला कोचिंगला घालू या का ? खर्च आपला जरा वाढेल .” मी व बाबा दोघे ही आईकडे बघत होतो. आई थोड्यावेळ शांत होती मग ती म्हणाली ,” अहो, तिला विचारा आधी, तिला खरंच खेळायचं आहे का ? माझी काहीच हरकत नाही.” बाबांनी माझ्या खांद्यावर हात टाकला आणि मला विचारले ,” काय गं , घेणार ना कोचिंग ? आवडतं ना खेळायला बॅडमिंटन ? ” माझे डोळे नक्की चमकले असणार आणि मी लगेच हो म्हणाले असेन. बाबा हसले, मला मिठी मारली. आपला उजवा गाल माझ्या डोक्यावर ठेवला. मी शेजारी बसलेल्या माझ्या बहीणीच्या खांद्यावर हात टाकला. सगळे मुटाटकर आम्ही हसत समुद्राकडे बघत होतो.दूर सूर्य आकाशात मावळत होता. आकाशाचा रंग केशरी झाला होता.
समुद्राने लोकांच्या डोळ्यात लपलेली अशी कितीतरी स्वप्नं पाहीली असतील ना ?
माझी पहिली समुद्राची आठवण म्हणजे मी बघितलेले बॅडमिंटन खेळायचे ‘ स्वप्न ‘.